Genesis 11

1आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. 2ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.

3ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. 4मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”

5आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. 6परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एकच असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. 7चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”

8मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. 9त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.

10ही शेमाची वंशावळी : जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा बाप झाला. 11अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुलगे व मुलींचा बाप झाला.

12अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला. 13शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

14जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; 15एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

16एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. 17पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

18पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. 19रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

20रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरूगाला जन्म दिला. 21सरूगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

22सरूग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला. 23नाहोराला जन्म दिल्यावर सरूग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

24नाहोर एकूणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. 25तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. 26तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.

27तेरहाची वंशावळ ही : तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. 28हारान, आपला बाप तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.

29अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायकोचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा बाप होता. 30साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.

31मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानाचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची बायको साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारानपर्यंत येऊन तेथे राहिले. तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.

32

Copyright information for MarULB